आज खूप दिवसांनी काही तरी लिहावसं वाटलं. खरंतर वाटण्यापेक्षा मुद्दामच लिखाणास सुरुवात केली कुणाच्या तरी आग्रहाखातर. पण काय लिहावं कसं लिहावं काहीच सुचेना. मग विचार केला नवीन वर्ष सुरु झालंय तर गेल्या वर्षाचा आढावा घ्यावा. बऱ्याच वर्षांनंतर २०१५ हे असं एक वर्ष होतं जे बरंच काही घेऊन गेलं पण जाता जाता बरंच काही शिकवून गेलं. मी गमावलेली सगळ्यात मोठी ठेवण म्हणजे माझ्या घरचा एक ऊर्जा स्रोत … माझी आज्जी. तिच्या असण्यामुळे आमचं अस्तित्व जन्माला आलं. खरंतर हे तिचं तिलादेखिल कळलं नसेल की ती आमच्या साठी किती प्रेरणादायी होती. जिद्द, साहस , स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा अनोखा आणि अलौकिक संगमच म्हणावा लागेल. स्त्री ही पुरुषाच्या इतकीच कर्तबगार आणि कणखर असू शकते हे आम्ही तिच्या जगण्यातून शिकत शिकत मोठे झालो. ते आमच्यामध्ये इतकं रुजलं कि एखादं संकट आलं तरी अर्धी भीती नाहीशी होते. खरं सांगायचं तर साध्या शेतकराच्या घरी जन्मली म्हणून, नाहीतर जरा कमी झाशी ची राणीच ती. व्यवहारज्ञान, दूरदृष्टी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चूक झाली तर ती मान्य करण्याचं आणि त्याची जवाबदारी घेण्याचं धाडस सगळ्यांकडेच असतं असं नाही. इतके सगळे headstrong पैलु असूनही तिने आणि एक गोष्ट शिकविली ती म्हणजे इतरांना मदत करणे. तिचेच सगळे गुण माझ्या आई मध्ये आहेत म्हणून मी आजचा हा दिवस पाहू शकते, जिथे मला जे वाटतं ते मी मांडू शकते, इतरांशी share करु शकते. स्वतःची मतं ठळक पणे मांडू शकते.
आजकाल जिकडे तिकडे स्त्री -पुरुष समानता, women empowerment, my life my choice इत्यादी वाद -विवाद , परिसंवाद होत असतात पण ह्या सगळ्यांपेक्षा कित्येक पटीने महत्वाचं आहे घरातल्या स्त्रियांनी ते अंमलात आणून पुढच्या पिढी समोर उदाहरण बनून राहणे. मी आणि माझी बहिण अतिशय नशीबवान आहोत की आम्ही अश्या दोन पिढ्या पाहिल्या ज्यांनी आम्हाला स्त्री सक्षम असते हे नुसतं सांगितलच नाही तर ते स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं. जेमतेम चौथी शिकलेली माझी आज्जी आयुष्य मात्र बिनकचू शिकलेली होती. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको हे अगदी लहानपणापासून ऐकत आलो आम्ही. तिच्या वयाच्या बाकीच्या आज्ज्या जेव्हा नवस, उपास, सोवळ करायच्या तेव्हा ती आम्हाला गोर -गरिबांना मदत करणे, मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे, ह्याच्यामध्ये देवपण शोधायला लावायची, जाती -जातींमधे भेदभाव न करणे, निसर्गाचा समतोल राखणे हे सर्व शिकवायची. सुट्टीला गेल्यावर भोपळ्याच्या घाऱ्या आणि अनारश्यांसोबत cake आणि ice -cream हि तितक्याच प्रेमाने बनवून द्यायची . आता विचार केला की वाटतं कुठून कळायच हे सगळं तिला? माणूस शिक्षणाने शहाणा होतो तर हे शिक्षण तिला मिळालं कुठून? आणि जर तिला आमच्या सारखी उच्च शिक्षणाची संधी मिळाली असती तर त्याचा ह्या जगाला किती फायदा झाला असता ?
आज ती आमच्यात नाहीये पण आमच्या मनात आणि विचारात असलेली आज्जी आमच्या बरोबर नेहेमी राहणार आहे आणि पिढी दर पिढी ही ज्योत आम्ही सतत तेवत ठेवणार आहे. आमच्याकडून jokes ऐकून दिलखुलास पणे हसणारी आज्जी. किती ही मोठे झालो तरी दिवाळी ला frock घ्यायला पैसे देणारी आज्जी, वेळ पडेल तेव्हा रागावणारी पण चिव्या आणि माव्या म्हणत जवळ घेणारी आज्जी. खुप भाग्य लागतं अशी strong आई आणि आज्जी मिळायला. प्रत्येक घरात जर अशी एक आज्जी असली तर कुठली हि स्त्री स्वतःला कधीच अबला समजणार नाही. अश्या माझ्या आज्जीला माझा सलाम……!!!
तुझीच
चारुता
आज ती आमच्यात नाहीये पण आमच्या मनात आणि विचारात असलेली आज्जी आमच्या बरोबर नेहेमी राहणार आहे आणि पिढी दर पिढी ही ज्योत आम्ही सतत तेवत ठेवणार आहे. आमच्याकडून jokes ऐकून दिलखुलास पणे हसणारी आज्जी. किती ही मोठे झालो तरी दिवाळी ला frock घ्यायला पैसे देणारी आज्जी, वेळ पडेल तेव्हा रागावणारी पण चिव्या आणि माव्या म्हणत जवळ घेणारी आज्जी. खुप भाग्य लागतं अशी strong आई आणि आज्जी मिळायला. प्रत्येक घरात जर अशी एक आज्जी असली तर कुठली हि स्त्री स्वतःला कधीच अबला समजणार नाही. अश्या माझ्या आज्जीला माझा सलाम……!!!
तुझीच
चारुता