गेले 2-3 दिवस खूप विचित्र वाटत होतं , काहीतरी रिकामं असल्यासारख, काहीतरी हरवलंय ,सापडत नाहीये,गमावलंय कि सुटत चाललंय. तसं पाहता काय नाहीये माझ्याकडे? छान घर,फिरायला गाडी, गरजे पुरते किवां थोडेशे जास्तं शिल्लक राहतील इतके पैसे, आवडीचं काम....मग चुकतंय कुठे? पण खूप एकट वाटतंय .जवळची माणसं आसपास दिसत नाही म्हणून? फोन वर बोलणं, skype करणं ह्या वरवरच्या आणि तात्पुरत्या औषधांनी बरा होणारा रोग नाहीये हा. लांब राहिल्यानं नात्यातील ओलावा संपणार तर नाही ना हि धास्ती, मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभारलेल्या माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीच्या संसाराची नौका डगमगत चालली आहे, तिला आधार द्यायला न जाता येण्याच हताशपण मनाला सैरभैर करत आहे. अमेरिकेत राहणं म्हणजे सोन्याचा पिंजरा वाटू लागलं आहे. असे आणि अनेक विचारांचा थैमान घेऊनच निद्राधीन झाले.
सकाळी उठले ते विजेच्या कडकडाटाने, खूप छान वाटले वेळेच्या आधीच का असेना गजराच्या कर्कश्य आवाजाने न उठता जाग आली, एक छोटीशी achievement वाटली.वाफाळलेला आलं -वेलची चा चहा घेऊन वरांड्यात बसले.समोर होत्या मुसळधार पावसाच्या सरी. टपोरे स्वत्छंद थेंब टप टप जमिनीवर पडत होते. मग आठवला तो शाळेत असतानाचा पावसाळा. जून चा पावसाळा सर्वच बदलून टाकायचा. नवीन वर्ग ,नवीन शिक्षिका, नवीन अभ्यास,नवीन वह्या-पुस्तकं , महिन्याभराच्या भेटीनंतर मैत्रीणीना झालेला आनंद सगळच नवीन आणि हवहवंसं. cycle ने शाळेला न जाता बाबा सोडायला येणार हा आनंद देणारा. पावसामुळे प्रार्थना आणि P .T चा तास वर्गातच बसावे लागणार हे दुख देणारा. खेळायला बाहेर जाण्यासाठी पाऊस जाण्याची वाट पाहणे, तसेच नवीन रेनकोट,छत्री मिरवण्यासाठी पाऊस येण्याची वाट पाहणे. कधी "येरे येरे पावसा " म्हणणे तर कधी "Rain rain go away, come again another day" म्हणणे असा कधी आवडता तर कधी नावडता.खरतर पाऊस तोच असतो वेगळा असतो तो दृष्टीकोन किवां परिस्थिती. परवाच एक उदाहरण वाचल किवा टिव्ही वर ऐकल्याचा आठवतंय. एका माणसाला दोन विवाहित मुली. मोठी चा नवरा शेतकरी. तिला भेटायला गेल्यावर ती म्हणते बाबा पाऊस लौकर आला पाहिजे नाहीतर पेरणी वाया जाईल. धाकटीला भेटायला गेला तिचा नवरा कुंभार, ती म्हणते बाबा पाऊस लौकर नाही आला तर बार होईल नाहीतर खूप नुकसान होईल. आला का आता यक्ष्य प्रश्न ?देवाकडे काय मागवा पाऊस यावा का न यावा?खरंतर त्याच्या हातात काहीच न्हवते. शेवटी त्याने दोघींना एकत्र बोलावले व म्हणाला पाउस आला, पिकं चांगली झाली तर मोठीने धाकटीला मदत करावी आणि पाउस नाही आला, धंदा चांगला झाला तर धाकटीने मोठीला मदत करावी. असा पावसावर अवलंबून असलेला प्रश्न बिनपावासाचाच सोडवला.
पाऊस ......प्रत्येकासाठी वेगळा असतो. चातक,शेतकरी प्रेमी युगुल ह्यांना हवाहवासा. तर रस्त्यावरील दुकानदार, चालत, दुचाकीने कामाला जाणार्यांना नकोनकोसा....पाऊस एकंच दृष्टीकोन अनेक.....माणसांचा हि तसच नसतं का? एकच व्यक्ती कोणाचा मित्र तर कोणाचा शत्रू, कुणीतरी त्याच्याशिवाय जगू शकत नाही आणि कुणीतरी त्याच्या सोबत.अगदी वेगवेगळी माणसं कशाला एकाच माणूस घनिष्ट मित्र, सखा सोबती आणि भांडण झाल्यावर तोच व्यक्ती नकोनकोसा होतो. व्यक्ती तोच असतो परिस्थिती वेगळी, पण आपण माणसाना दोष देत बसतो. विचारांची लागलेली तंद्री वाऱ्याने आलेल्या तुषारांनी भंग केली.पाहिलं तर सरीचा जोर ओसरला होता. रस्त्याच्या बाजूने पाणी वाहत होतं. अंगणातील धूळ,कचरा,पाला-पाचोळा सोबत घेऊन, मागे राहिलं होता स्वच्छ अंगण आणि ताजेतवाने वातावरण. आपसूकच पाऊले बाहेरच्या दिशेने वळली.......पावसाकडे......जणू पाऊस येताना माझ्या प्रश्नांची उत्तर सोबतच घेऊन आला होता. डोळे आकाशाकडे टक लावत होते......जणू त्याला साद घालत होते......बरस मोठ्याने बरस.....इतका कि अगदी मनापर्यंत पोहोच.मनातलं सगळ दुख, सगळी मळभ वाहून ने. मागे ठेव, टवटवीत ताजातवानं मन,नकोसा कचरा दूर कर आणि स्वच्छ कर माझ्या मनाला. मनसोक्त चिंब भिजले पावसात.
आता सर्व खरतर तेच आहे अगदी तसंच. पण बदलला आहे तो फक्त माझा दृष्टीकोन...........नवीन,स्वच्छ आणि आनंदी.............
आपलीच
चारुता......:-)